गायब केलेलं रेडकू चोवीस तासात गोठ्यावर हजर
(भलत्या प्रकाराची नागरिकांमध्ये चर्चा)
उंब्रज/प्रतिनिधी
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील रहिवासी दीपक पाटील यांचे अचानकपणे गोठ्यावरून गायब झालेले रेडकू चोवीस तासात गोठ्यावर हजर झाल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत असून या भलत्या प्रकाराची चर्चा चांगलीच नागरिकांमध्ये रंगली आहे. दरम्यान,याबाबत पाटील कुटुंबीयांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गुरुवार दिनांक चौदा मे रोजी रात्रीच्या सुमारास गोठ्यामध्ये नव्याने व्यायलेल्या म्हैशीचे रेडकू अचानकपणे गायब झाल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला होता. नेहमीप्रमाणे गोठ्यातील कामे करण्यासाठी पाटील कुटुंबीय गेले असता आपले रेडकू गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गोठ्याच्या परिसरात सर्वत्र शोधाशोध केली असता रेडकाचा कोणताही मागमूस आढळून आला नाही. बिबट्या,तरस यांसारख्या वन्य प्राण्यांनी तर रेडू नेले नसेल ना? अथवा पाळत ठेवून कोणी अज्ञात व्यक्तींनी रेडकू चोरले तर नसेल ना? अशा नाना शंका कुशंका नागरिक उपस्थित करत होते. रेडकू गायब झाल्यामुळे म्हैस धार देत नसल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची चिंता पाटील कुटुंबीयांना लागली होती. म्हैस पानवण्यासाठी विविध औषधोपचार करण्यात आले. परंतु,म्हैशीने दूध काही दिले नाही. दरम्यान,शुक्रवार दिनांक पंधरा मे रोजी गायब झालेले रेडकू सकाळी अचानकपणे गोठ्याच्या परिसरात आढळून आल्याने पाटील कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला असून पाटील कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान टळले आहे. दरम्यान अचानकपणे गोठ्यावरून गायब झालेले रेडकू चोवीस तासात गोठ्यात हजर झाल्याच्या या अजब प्रकाराची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे.





