पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा परदेश दौरा संपन्न : इटलीतील यशस्वी भेटीनंतर महत्त्वपूर्ण करारांना गती
नवी दिल्ली / रोम :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला पाच देशांचा अधिकृत परदेश दौरा पूर्ण करून इटलीतील यशस्वी भेटीनंतर नवी दिल्लीत परतले आहेत. या दौऱ्याचा शेवटचा टप्पा इटलीमध्ये पार पडला असून, या भेटीत भारत–इटली संबंधांना मोठी चालना मिळाली आहे.
इटली दौऱ्यादरम्यान भारत आणि इटली यांनी आपल्या संबंधांना “स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप” (विशेष धोरणात्मक भागीदारी) असा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक व्यापक आणि संरचित होणार आहे.
इटलीच्या पंतप्रधान गिओरीजि मेलोनी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत दोन्ही देशांनी कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, आयुर्वेद, महत्त्वपूर्ण खनिजे आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. तसेच भारतातून इटलीमध्ये परिचारिकांच्या (नर्सेस) रोजगारासाठी सुलभ व्यवस्था करण्याबाबतही करार झाला आहे.
या दौऱ्यात करचोरी, मनी लॉन्डरिंग आणि दहशतवाद वित्तपुरवठा रोखण्यासाठी महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. संरक्षण क्षेत्रात सहविकास आणि सहउत्पादनासाठी रोडमॅप तयार करण्यात आला असून, जहाजबांधणी, बंदर आधुनिकीकरण, लॉजिस्टिक्स आणि ब्लू इकॉनॉमी क्षेत्रातही सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि इटली “डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली आणि डिलिव्हर फॉर द वर्ल्ड” या तत्त्वावर पुढे जाणार असल्याचे सांगितले.
दोन्ही देशांनी 2027 हे वर्ष “इटली–भारत संस्कृती आणि पर्यटन वर्ष” म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यात भारताला अन्न आणि कृषी संघटनेत (FAO) विशेष सन्मानही मिळाला आहे.





