ए.बी.पी. शिक्षण समूहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
नवे पारगाव प्रतिनिधी :ए.बी.पी. शिक्षण समूहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शाळेचा राष्ट्रीय खेळाडू कु. आयुष बाळासो पाटील याची खेळाडू आरक्षण मधून भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी आणि एन.एम.एम.एस. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
हा सत्कार संस्थेचे मा. अध्यक्ष डॉ ए बी पाटील .सचिव अमोलकुमार पाटील .सचिवा राजलक्ष्मी पाटील, संचालिका आकांक्षा पाटील , प्राचार्य एस आर पाटील प्रा.प्रतीक मोरे अनिवासी विभाग प्रमुख प्रमोद चव्हाण सर तसेच क्रीडाशिक्षक श्री. एस. बी. पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
इयत्ता दहावी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक कु.उत्कर्ष अनिल परमणे (९७.६०%), द्वितीय क्रमांक कु. हंसराज सचिन जाधव (९६.६०%), तृतीय क्रमांक कु. अथर्व भास्कर मोहिते (९३.८०%) तर चतुर्थ क्रमांक कु. ओम प्रकाश निकम (९३.४०%) यांनी प्राप्त केला. या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच इयत्ता बारावी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक कु. प्रज्ञा नेताजी पाटील (७४.८३%), द्वितीय क्रमांक कु. प्रतीक्षा शशिकांत बावचकर (७०.८३%) तर तृतीय क्रमांक कु. अनुष्का वीरेंद्र पाटील (७०.६७%) यांनी संपादन केला.
एन.एम.एम.एस. परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी तन्मय पंकज बोराटे , अंश प्रफुल्ल गोडे व अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
“मी आज जो काही घडलो, तो या शाळेमुळेच. शाळेने मला उच्च स्तरावर नेले,” असे मनोगत राष्ट्रीय खेळाडू आयुष पाटील याने व्यक्त केले. पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना आयुष पाटील यांचे वडील बाळासो पाटील सर यांनी “माझा मुलगा या शाळेने घडवला,” असे सांगत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रतिक मोरे सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रशालेचे प्राचार्य एस. आर. पाटील सर यांनी वेळेचा सदुपयोग करून आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करण्याचा बहुमोल संदेश विद्यार्थ्यांना दिला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. ए. बी. पाटील सर तसेच संस्थेचे सचिव अमोलकुमार पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. एम. बामणे मॅडम यांनी केले. प्रास्ताविक सौ. एस. एम. वाडीकर मॅडम यांनी केले तर आभार सौ. एस. एम. पोवार मॅडम यांनी मानले.





