संच मान्यतेतील घातक निकष प्रचलित शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणार
मिरज प्रतिनिधी संजय पवार
हजारो शिक्षक अतिरिक्त करण्याचे षडयंत्र ,पवित्र पोर्टल मध्ये शिक्षकांची रिक्त पदे येणार नाही याची तसदी घेतली जात आहे शिक्षक पात्रता उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या भरतीची दारे बंद करण्याचा घाट घातला जात आहे.संचमान्यतेतील घातक निकष लावून प्रचलित शिक्षण व्यवस्था उध्वस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गेली दोन वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयात सुरू आहे यातून अनेक प्रश्न या स्तरावर निर्माण झालेले आहेत, त्याचे निदान अजूनही होत नाही अशी स्थिती आहे. तर शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून शालेय शिक्षणात हे बदल येऊ घातले आहेत, मात्र त्यापूर्वीच प्राथमिक व माध्यमिक शाळेला १५मार्च २०२४च्या संच मान्यतेच्या घातक निकषाने राज्यातील जवळपास आठ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. हजारो शिक्षक राज्यात अतिरिक्त झाले आहेत. आता उच्च माध्यमिक ची संचमान्यता ऑनलाईन करण्याचे निमित्त साधून हजारो कनिष्ठ महाविद्यालये अनुदानास पात्र ठरणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे. राज्यात दहा ते बारा हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त होतील संच मान्यतेचा घातक निकष असलेला असा मसुदा (ड्राप्ट )तयार केला गेला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण व दुर्गम भागातील बहुजन विद्यार्थी व विशेष: मुली ह्या शिक्षणापासून वंचित होणार आहेत. एका वर्गामध्ये 120 विद्यार्थी शिकवताना त्या वर्गातील विद्यार्थ्यांवर अध्यापनाबाबत होणारा अन्याय दुर्लक्षित केला जात आहे. .
विज्ञान शाखेत वीस विद्यार्थी प्रात्यक्षिक गट असताना त्याऐवजी चाळीस विद्यार्थी. २० वर्षापेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी गृहीत न धरणे पूर्वी हजेरीची अट तीस विद्यार्थी, मुलींची संख्या १५असल्यास सूट, पिनल कट, आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची संख्येतील सूट ह्या व ईतर सगळ्या प्रचलित निकषांना डावलून ऑनलाइन संच मान्यता तयार करण्यात आलेल्या आहेत, विद्यार्थी शिक्षक आणि समाजाला हितकारक व्यवस्था संपुष्टात आणून मोफत शिक्षण व्यवस्था नेस्तनाबूत करण्याच्या या घातक निर्णयाला विरोध करणे गरजेचे आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ कार्यकारीणीने घेतलेल्या निर्णयानुसार संच मान्यतेतील घातक निकषाच्या विरोधात दि. ११ मे २०२६ला पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामध्ये अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षकांनी हजारोच्या संख्येने त्यात सहभागी व्हावे. असे आवाहन सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा सुरेश भिसे, सचिव प्रा दिलीप जाधव, कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील, प्रा धनपाल यादव, प्रा.पी.व्ही.जाधव, प्रा.वर्धमान भिलवडे, प्रा के जी तनंगी, आदींनी केले आहे.





