कळंत्रेवाडी येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण पाण्याविना कोरडेच
रस्त्याचा दर्जा ढासळण्याचा धोका नागरिकांकडून व्यक्त
उंब्रज/प्रतिनिधी
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील मुख्य चौकात उत्तरमांड नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाटण पंढरपूर राज्य मार्गाला लागून रस्ता उकरण्यात आला आहे. दरम्यान,रस्ता उकरल्यानंतर त्या ठिकाणी सिमेंटचे काँक्रीट टाकण्यात आले आहे. परंतु, सदर काँक्रेट मजबूत होण्यासाठी वरचेवर पाणी मारणे गरजेचे असताना, संबंधित विभागाचे त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे कोरड्या व पांढऱ्या पडलेल्या काँक्रिटीकरणाकडे पाहून आढळून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी काँक्रिटीकरण कमजोर होऊन भविष्यात रस्त्याचा दर्जा ढासळण्याचा धोका नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या ठिकाणी योग्य तितक्या प्रमाणात पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम सुरू असताना अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर काही दिवसातच रस्ते उखडून खड्डे पडण्याचे प्रमाण अलीकडील काळात वाढले आहे. त्यामुळे शासकीय तिजोरीत कर रूपाने जमा होणाऱ्या जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असून अशा प्रकारच्या हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार,अधिकारी अथवा इतर संबंधित घटकांवरती सरकारने कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
रस्त्याचे काम संथगतीने.. वाहतुकीचा खोळंबा
सदर ठिकाणाहून भवानवाडी सूर्यवंशी मळा,पवार मळा, चरेगावकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच स्थानिक शेतकरी शेत मालाची वाहतूक करण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करतात.परंतु,
या ठिकाणी रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असून त्यामुळे येथे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.





