24.3 C
New York
Saturday, June 13, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

अवकाळीचा इशारा; राज्यातील १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, मान्सून १० जूननंतर महाराष्ट्रात

 

पुणे : राज्यातील हवामानात मोठे बदल होत असून, उष्णतेच्या लाटेनंतर आता अवकाळी पावसाने हजेरी लावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ ते ४८ तासांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, मान्सूनच्या आगमनाबाबतही दिलासादायक अंदाज समोर आला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि चंद्रपूर जिल्ह्यांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण राहणार असून उष्णतेचा तडाखा कायम राहणार आहे.

राज्यात अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात असताना अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत आहेत. विशेषतः फळबागा, भाजीपाला आणि काढणीला आलेल्या पिकांना अवकाळीचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली थांबणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, दक्षिण-पश्चिम मान्सून २६ ते २७ मेदरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर १० ते १२ जूनदरम्यान कोकण व मुंबईत, तर १५ जूनपर्यंत राज्याच्या बहुतांश भागांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा देशात सरासरीच्या ९२ ते ९५ टक्के पाऊस पडण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला असून, तो शेतीसाठी समाधानकारक मानला जात आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles