माथेरानमध्ये प्रथमच आंतरशालेय कराओके गायन स्पर्धेचा भव्य सोहळा
सत्याचा शिलेदार वार्तापत्र | चंद्रकांत काळे, रायगड (माथेरान)
रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ माथेरान येथे प्रथमच आंतरशालेय कराओके गायन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. स्थानिक विद्यार्थ्यांमधील गायन कला जोपासण्यासाठी आणि त्यांना मोठ्या मंचावर संधी मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
माथेरानमध्ये सुमारे ९५% रहिवासी व्यवसायिक व दुकानधारक असूनही शिक्षणाला येथे मोठे महत्त्व दिले जाते. येथील अंगणवाडी, वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळा, सेंट झेवियर हायस्कूल आणि प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर हायस्कूल अशा चार शाळांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
नगरसेवक व शिक्षण सभापती सुनील शिंदे, शिक्षण समिती सदस्य प्रतिभा घावरे, सुरेखा साळुंखे आणि केतन रामाने यांच्या संकल्पनेतून, तसेच नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी व मुख्याधिकारी प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान नगरपरिषदेमार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.
दिनांक ३१ एप्रिल २०२६ रोजी वीर हुतात्मा भाई कोतवाल शाळेच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेत एकूण ३२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा तीन गटांमध्ये पार पडली.
🏆 विजेते पुढीलप्रमाणे :
🔹 लहान गट
प्रथम – सावध राठोड
द्वितीय – देधा आखाडे
तृतीय – गर्दी शिंदे
🔹 मध्यम गट
प्रथम – अरतुर लुडकर
द्वितीय – सई लोखंडे
तृतीय (संयुक्त) – श्लोक आबनावे व रुद्र सुतार
🔹 मोठा गट
प्रथम – वैष्णवी सकपाळ
द्वितीय – समृद्धी आखाडे
तृतीय (संयुक्त) – वैधयी आखाडे व ऊबदहुल्ला खान
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वाठोरे यांनी केले. या स्पर्धेसाठी गायक चंद्रकांत काळे, गौरी कवठाणकर आणि छोटू खान यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संतोष शेलार, गटनेते शिवाजी शिंदे, विद्यमान व माजी नगरसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
माथेरानमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नवे व्यासपीठ मिळाले आहे. नगरसेवक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.





