मिणचेत सामूहिक वाढदिवस सोहळ्यातून सामाजिक एकोपा, ग्रामविकासासाठी नागरिकांचा निर्धार

मिणचे, ता. हातकणंगले : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो. मात्र या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड देत मिणचे गावाने एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. १ जून ही जन्मतारीख असलेल्या गावातील नागरिकांचा सामूहिक वाढदिवस उत्साहात साजरा करताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शासकीय नोंदींमध्ये अनेकांची जन्मतारीख १ जून अशी नोंदलेली असते. त्यामुळे अनेकांना आपला वाढदिवस विशेषत्वाने साजरा करण्याची संधी मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन मिणचे गावात १ जून जन्मतारीख असलेल्या तब्बल २६ नागरिकांना एकत्र आणून त्यांचा सन्मानपूर्वक वाढदिवस साजरा करण्यात आला. फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन तसेच केक कापून उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केलेल्या भावना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणाऱ्या ठरल्या. “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझा वाढदिवस इतक्या प्रेमाने आणि सन्मानाने साजरा होत आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या एका वाक्याने उपक्रमाचे महत्त्व आणि त्यामागील आत्मीयता अधोरेखित झाली.
या सोहळ्यात गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाढदिवस साजरा करण्याबरोबरच गावाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध विकासात्मक, सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार गावाच्या विकासात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमात बोलताना संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय घुगरे यांनी मिणचेच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “मामा साहेब, शिवराम तात्या मातन गुरुजी यांसारख्या थोर व्यक्तींनी गावाला विचारांचा आणि कार्याचा समृद्ध वारसा दिला आहे. हा इतिहास आणि परंपरा जपणे, त्यात भर घालणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. पूर्वजांनी उभारलेले जपणे, वाढवणे आणि टिकवणे हेच खऱ्या अर्थाने वारसदारांचे कर्तव्य आहे. प्रत्येक घर समृद्ध झाले तर गावाचा विकास आपोआप साध्य होईल. भावी पिढीला अभिमान वाटेल असे कार्य आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे.”
त्यांच्या मनोगताला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढदिवसाच्या आनंदी वातावरणात ग्रामविकासाचा विचार मांडला गेल्याने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मनोहर परीट यांनी केले, तर स्वागत व प्रास्ताविक पोपट वाकसे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या, आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
वाढदिवसाचे निमित्त, विकासाचा संकल्प
वैयक्तिक आनंदाचा क्षण सामूहिक जबाबदारीच्या भावनेशी जोडत ग्रामविकासाचा संदेश देणारा मिणचेचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात प्रेरणेचा ठेवा निर्माण करून गेला. सामाजिक एकोपा, परस्पर स्नेह आणि गावप्रेम यांचे सुंदर दर्शन घडविणारा हा उपक्रम इतर गावांसाठीही अनुकरणीय ठरत आहे.





