26.1 C
New York
Friday, September 18, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

चोकाक येथे ‘महसूल समाधान शिबीर’; शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी

चोकाक येथे ‘महसूल समाधान शिबीर’; शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी

 

हेरले / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने नागरिकांना विविध शासकीय सेवा, दाखले आणि कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ रविवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विशाल मंगल कार्यालय, चोकाक (ता. हातकणंगले) येथे आयोजित करण्यात आले आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित या विशेष शिबिरातून शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.

 

शिबिरामध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी, पशुसंवर्धन, भूमी अभिलेख, नगरपरिषद, महावितरण, परिवहन महामंडळ, टपाल विभाग आदी शासकीय विभागांमार्फत सातबारा, उत्पन्न, जात, अधिवास व नॉन-क्रीमीलेअर दाखले, शिधापत्रिका सेवा, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, लक्ष्मी योजना, जननी सुरक्षा योजना, गोल्डन कार्ड, पीक विमा, नमो शेतकरी महासन्मान, पीएम-किसान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, आधुनिक कृषी अवजारे, ठिबक सिंचन, माती परीक्षण, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, दिव्यांग कल्याण योजना, सोलर ऊर्जा, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना, एसटी सवलत पास, आधार दुरुस्ती, बचत खाते व विमा योजना, तसेच पशुपालन, शेळी-मेंढी, दुभती जनावरे व कुक्कुटपालन योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, मार्गदर्शन, मंजुरी आदेश व लाभांचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार अरुण लाड, शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, आमदार सतेज (बंटी) पाटील, जिल्हाधिकारी विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, नोडल अधिकारी शक्ती कदम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शिबिरात लाभार्थ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असून हातकणंगले तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles