आदर्श गुरुकुल विद्यालय येथे ‘मराठी गौरव राज्यभाषा दिन’ उत्साहात साजरा

पेठ वडगाव : दि. २७ फेब्रुवारी रोजी आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठ वडगाव अनिवासी विभाग येथे ‘मराठी गौरव राज्यभाषा दिन’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. विद्यार्थ्यांनी आकर्षक भित्तीपत्रिका तयार करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. डी. एस. घुगरे यांच्या प्रेरणेने तसेच विद्यालयाच्या सचिवा व मुख्याध्यापिका सौ. एम. डी. घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अनिवासी विभागप्रमुख श्री. एस. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध साहित्यपरंपरा आणि जागतिक पातळीवरील स्थान याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले.
या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, साहित्य व साहित्यिकांची ओळख, प्रश्नमंजुषा, मराठी भाषेवरील नाटिका, हस्ताक्षर स्पर्धा तसेच ‘मराठी भाषा गौरव गीता’वर नृत्य सादरीकरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मराठी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केला. काही विद्यार्थ्यांनी मराठीच्या जतन व संवर्धनाबाबत प्रभावी मनोगते सादर केली.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी ‘पसायदान’ म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





