रूकडी येथे प्राथमिक शाळेला आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
रूकडी (ता. हातकणगले), दि. २७ : रूकडी येथील कुमार विद्या मंदिर शाळेतील पडझड झालेल्या अडगळीच्या खोलीला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. ग्रामस्थांच्या लक्षात ही घटना आल्याने तातडीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात न आल्याने इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आली.
सुदैवाने विद्यार्थ्यांचे संमेलन बाहेरगावी असल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत जुने लाकडी साहित्य, बेंच व पुस्तके जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग विझविताना एक कर्मचारी गुदमरल्याने काही काळ गोंधळ उडाला.
दरवाजे नसलेल्या अडगळीच्या खोलीत व्यसनी युवकांचा वावर असल्याने गांजा सेवन करताना निष्काळजीपणामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच व सदस्य घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद झाला नव्हता.दरम्यान, परिसरात वाढत्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण आणण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





