प्रा. संतोष कुलकर्णी यांना पीएच.डी.
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक संतोष कुलकर्णी यांना व्यवस्थापन विषयात पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे.
कुलकर्णी यांनी प्रा. डॉ. मुरली भूपती यांच्या मार्गदर्शनाखाली “कोल्हापूर जिल्ह्यातील निवडक लघु व मध्यम उद्योगांमधील लीन उत्पादन पद्धतींचा गुणवत्ता कार्यक्षमतेवर व स्पर्धात्मक लाभावर होणारा परिणाम” या विषयावर शोधप्रबंध सादर केला. प्रा. डॉ. जयेन्द्र खोत हे त्यांचे सह-मार्गदर्शक होते.
या संशोधनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील लघु व मध्यम (SME) फाउंड्री उद्योगांचा सखोल अभ्यास करण्यात आला असून लीन उत्पादन पद्धतींच्या प्रभावामुळे गुणवत्ता सुधारणा, उत्पादनक्षमता वाढ आणि उद्योगांची स्पर्धात्मकता कशी वृद्धिंगत होते याबाबत महत्त्वपूर्ण निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
या संशोधन कार्यादरम्यान डॉ. कुलकर्णी यांनी सहा संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये प्रकाशित केले असून एका आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन सादर केले आहे.
डॉ. कुलकर्णी यांना शैक्षणिक क्षेत्रातील ११ वर्षांचा अनुभव असून फाउंड्री उद्योगात साडेतीन वर्षे प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आहे.
त्यांच्या या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेन्द्र खोत, अधिष्ठाता प्रा. डॉ. मुरली भूपती तसेच सहकारी प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.





