तळसंदे- सामंजस्य करारावेळी डॉ. अनिलकुमार गुप्ता, श्री. रेजू आर, डॉ. जयेंद्र ए. खोत, डॉ. योगेश चिमटे, श्री. सबरीश्वरन आर.
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञान विषयक कौशल्ये आत्मसात करून उद्योगाभिमुख शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाने एरोबॉट्झ अनमॅन्ड टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारातर्गत लवकरच विद्यार्थ्यांसाठी ड्रोन व मानवरहित हवाई वाहन तंत्रज्ञानातील अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
विद्यापीठाच्या आंतरशाखीय अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने (सीआयएसआर)हा करार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत कौशल्यविकास कार्यक्रम, प्रत्यक्ष ड्रोन प्रशिक्षण, कार्यशाळा, संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच ज्ञानविनिमय उपक्रम राबविण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष हाताळणी करता येणार असून उद्योग क्षेत्रातील गरजांनुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत.
सदर सामंजस्य करारावर कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार एस. गुप्ता, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र ए. खोत, सीआयएसआरचे संचालक डॉ. योगेश चिमटे तसेच एरोबॉट्झ अनमॅन्ड टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चे संचालक श्री. रेजू आर. यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी श्री. सबरीश्वरन आर. उपस्थित होते.
या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतांमध्ये वाढ होईल. ड्रोन तंत्रज्ञान व यूएव्ही अनुप्रयोग क्षेत्रातील उदयोन्मुख करिअर संधींसाठी ते अधिक सक्षम होतील, असा विश्वास डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केला.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र- कुलपती ऋतुराज संजय पाटील यांच्या मार्गदर्शन व सहकार्य लाभले.





