नागावमध्ये जमिनीच्या वादातून तलवारीने हल्ला; ९ जखमी, ४० जणांवर गुन्हा
नागाव ( वार्ताहर :मिलिंद कुशीरे) : (ता. हातकणंगले) येथील वड्याचा मळा परिसरात जमिनीच्या वहिवाटीच्या रस्त्याच्या वादातून गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजता दोन गटांत हिंसक संघर्ष झाला. तलवारी, कोयते, लोखंडी रॉड, हॉकी स्टिक व काठ्यांनी करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात ९ जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रभाकर ऐतवडे व चौगुले गटामध्ये रस्त्याच्या मालकी हक्कावरून जुना वाद आहे. पोलिसांनी यापूर्वी दोन्ही बाजूंना नोटीस देऊन शांतता राखण्याचे निर्देश दिले होते. तरीही कंपाउंड बांधकाम सुरू असताना ३० ते ३५ जण चार–पाच गाड्यांतून येऊन हल्ला केल्याचा आरोप आहे.
हल्ल्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व आयफोन हिसकावल्याची तसेच गव्हाच्या पिकाचे नुकसान केल्याची तक्रार आहे. घटनेनंतर काही आरोपी ऊसाच्या शेतातून पळून गेले.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे महादेव चौगुले, राजेंद्र चौगुले यांच्यासह ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.





