कोल्हापूर जिल्ह्यात परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज :शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात बारावी व दहावीच्या परीक्षांची सुरळीत, पारदर्शक व गैरप्रकारमुक्त अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व दक्षता वाढविण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
जिल्ह्यात बारावीच्या एकूण ७३ केंद्रांपैकी ६८ केंद्रांवरील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. उर्वरित पाच केंद्रांवर सीसीटीव्हीची सुविधा नसल्याने त्या केंद्रांवरील संचालक व संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे. तसेच दहावीच्या १४१ केंद्रांपैकी १३१ केंद्रांवर पूर्ण वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी हे दक्षता समितीचे प्रमुख असून त्यांच्या अध्यक्षतेखाली संस्था चालकांची बैठक घेऊन सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही नसलेल्या व उपद्रवी केंद्रांवर ड्रोन शूटिंग व व्हिडीओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथके व भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी ५० हजार ४८७ तर दहावीच्या परीक्षेसाठी ५५ हजार ८४ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा पत्र देण्यात आले असून, सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.





