तळसंदे- विविध स्पर्धांमधील विजेत्यांना गौरवताना प्रा. एन. शेलार, पी. डी. उके, पी. एस. पाटील, ए. बी. गाताडे व प्राध्यापक.
तळसंदे :-येथील डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. ऍग्री, बी. एस्सी. ऍग्री व ऍग्री डिप्लोमा या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि कृषी रंग २०२६ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
वर्षभरामध्ये महाविद्यालयामध्ये शैक्षणिक उपक्रम, विविध कला व खेळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले अशा विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला.
उपप्राचार्य प्रा. पी. डी. उके म्हणाले ध्येय, जिद्द व परिश्रमाच्या बळावर विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे. शिक्षण हे जीवनाचा अर्थ समजून सांगण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सर्जनशीलतेला आविष्कार घडवावा.
कृषी रंग २०२६ या नावाने साजरा करण्यात आलेल्या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या नृत्य, गायन, नाटक, फॅशन शो सादर केले. कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. शिल्पा माळी व प्रा. माधुरी केंगरे यांनी काम केले. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी प्राचार्य डॉ. सुहास पाटील, प्राचार्य डी. एन. शेलार, प्राचार्य पी. एस. पाटील, इंजि. ए. बी. गाताडे, प्रा. आर. आर. पाटील, आर. पी. शिंदे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.





