उद्यमनगरमधून युवक बेपत्ता; तपासाची गती मंद, कुटुंबाकडून आमरण उपोषणाचा इशारा
रत्नागिरी | प्रतिनिधी
उद्यमनगर, रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. फैमिदा सुर्वे यांचे पती अली फारुक सुर्वे हे गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असून, रितसर तक्रार दाखल करूनही तपासाला अपेक्षित गती मिळताना दिसत नाही. अद्याप त्यांच्या बाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी सुरू असलेल्या तपासात आवश्यक ती तत्परता दिसून येत नसल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. लोकेशन मिळवण्यासंदर्भातही पोलिसांकडून ठोस कृती झालेली नाही, असे सुर्वे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
“आमरण उपोषणाचा इशारा”
तपासास पुढील २४ तासांत गती न मिळाल्यास संपूर्ण कुटुंब आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणातील विलंबामुळे कुटुंबीय प्रचंड अस्वस्थ आहेत.
“पूर्वीही अशा घटना घडलेल्या”
खंडाळा येथून यापूर्वीही दोन व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्या प्रकरणांत वेळेवर प्रभावी तपास न झाल्यामुळे गंभीर परिणाम झाले होते. त्यामुळे अशाच घटना रत्नागिरीत होऊ नयेत, अशी अपेक्षा सुर्वे कुटुंबीयांनी व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी तत्काळ गंभीर दखल घेऊन बेपत्ता अली फारुक सुर्वे यांचा शोध लावावा, अशी मागणी कुटुंबीय व सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.





