महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’ कार्यक्रम संपन्न

विजेसारख्या जोखमीच्या तांत्रिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव
कोल्हापूर, दि. ३० सप्टेंबर २०२५ : महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयात स्त्री शक्तीला समर्पित नवरात्र उत्सवानिमित्त ‘सन्मान सौदामिनींचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून महावितरणमध्ये कार्यरत महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ‘कुटुंब व कार्यालयातील समतोल साधा, आहार-आरोग्य सांभाळा व नवनवीन गोष्टी शिकत राहा.’ असे मत मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात, विजेसारख्या तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांना पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. काही कर्मचारी महिलांनी, सर्वच स्तरातील महिलांच्या सामाजिक व आर्थिक संघर्षांचा उल्लेख करत आपल्या प्रवासातील अनुभव व्यक्त केले. अनेक महिलांनी ज्या प्रकारे कठीण प्रसंगांना तोंड देत यशस्वी कारकीर्द घडवली, ते उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले. या उपक्रमामुळे महिलांच्या कार्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त होत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
या प्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंते सुनिल गवळी, म्हसु मिसाळ, अजित अस्वले, अशोक जाधव, सुधाकर जाधव, सागर मारुळकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) शुभदा गणेशाचार्य, व्यवस्थापक (विवले) स्नेहा पार्टे व इतर महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) आप्पासाहेब पाटील यांनी केले.





