तळसंदे: राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयं सेवक विद्यार्थी सोबत प्रा केदार रेडेकर, श्री देवेंद्र भोसले व वनपाल संगम खुपसे, पी एन डफडे व इतर.
डी वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने वन विभागाच्या सहकार्याने आंबा येथे विशेष स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी ‘स्वच्छ अंबा – सुंदर आंबा’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या मोहिमेत महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक, प्राध्यापक व अधिकारी सहभागी झाले होते.
गांधी जयंती आणि स्वच्छता पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर तसेच राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह आणि वन्यजीव सप्ताहच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर आंबा घाट व आजूबाजूच्या पर्यटनस्थळी स्वच्छता उपक्रमाला सुरुवात झाली. या मोहिमेत स्वयंसेवकांनी रस्त्याच्या कडेने, जंगलाच्या काठावर, आणि पर्यटन स्थळांवर पडलेला कचरा गोळा केला. या उपक्रमात एकूण ३० ते ४० कचऱ्याच्या पिशव्या संकलित झाल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, थर्माकोल, खाद्यपदार्थांचे रॅपर, तसेच तुटलेल्या बाटल्या आढळल्या.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. केदार रेडेकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, आणि वन्यजीव संरक्षणाची जाणीव व्हावी हा आमचा उद्देश आहे. पर्यटकांनीही परीसर अस्वच्छ होणार नाही, पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
यावेळी वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले, वनविभाग अधिकारी एसीएफ कमलेश पाटील, आरएफओ उज्वला मगदूम, आरएफओ सुषमा जाधव , वनपाल पांडुरंग चव्हाण, वनरक्षक अफ्रीन देवळेकर व वैष्णवी संगम खुपसे, पी एन डफडे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.





