विजयादशमी दसरा कथा व रहस्य !
सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी डॉ. उमेश सुतार
आश्विन शु. १० हा दिवस सर्व भारतांत ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतीयांच्या मूर्तिमंत पराक्रमाचा इतिहासच ‘विजयादशमी’ त दिसून येतो. हिंदु समाजांतील चारहि वर्णांच्या दृष्टीनें या दिवसाला महत्त्व आहे. विद्येची आराधना आणि जोपासना करणारा ब्राह्मण-वर्ग याच दिवशीं सरस्वतीची पूजा करुन ज्ञानाचे पाठ घेत असतो. आपल्या अद्वितीय बाहुबलानें पराक्रम करणारे क्षत्रिय वीर विजयादशमीलाच आपल्या शस्त्रास्त्रांचे पूजन करुन देशरक्षणासाठीं, शत्रूंचा नि:पात करण्यासाठीं सीमोल्लंघन करीत असतात. नवीन धन निर्माण करणें हें ज्या वैश्यांचे कार्य त्यांच्याकडून याच वेळीं शेतांतून नवीन नवीन धान्यें निर्माण झालेलीं असल्यामुळें सृष्टीस ‘सुजला सुफला’ असें स्वरुप प्राप्त झालेलें असतें. शत्रुपक्षाचा पराभव करुन आणलेली धनदौलत स्वकीयांना या दिवशी वांटण्याची प्रथा आहे. याचा उगम रामायणाच्या पांचव्या सर्गात सांपडतो. आपल्या गुरुस चौदा कोटी सुवर्ण-मुद्रांची दक्षिणा देतां यावी म्हणून कौत्स नांवाचा ब्राह्मण-पुत्र रघुराजाकडे आला. त्याच वेळीं रघुराजानें नुकताच विश्वजित् यज्ञ केलेला असल्यामुळें तो दरिद्री झाला होता. पण आलेल्या याचकास विन्मुख न पाठवितां रघूनें कुबेरावर स्वारी करुन त्याच्याकडे सुवर्ण-मुद्रांची मागणी केली. बिचार्या कुबेरानें भयभीत होऊण अयोध्या नगराबाहेर एका शमीच्या वृक्षावर सुवर्णवृष्टि केली. त्यांतील चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौत्सास मिळाल्या. उरलेलें सुवर्ण रघुराजानें नागरिकांना वांटून टाकिलें. हा दिवस सुद्धां आश्विन शु. १० हाच होता. या वेळपासून सोनें लुटण्याची प्रथा रुढ झाली असावी. असें सांगतात कीं,याच दिवशीं प्रभु रामचंद्रांनीं रावणाचा नाश करण्यासाठीं लंकेवर स्वारी केली. अशा प्रकारें हा दिवस पराक्रमाचा, विद्यार्जनाचा, म्हणून भारती यांना अत्यंत उत्साहदायक वाटतो. तीनचार महिने पावसाळ्यांत विश्रांति घेतल्यानंतर मराठ्यांच्या फौजा याच दिवशीं शत्रूचा पराभव करण्यासाठीं ‘सीमोल्लंघन’ करीत असत.
*दसरा*
हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते.
दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र यांनी याच दिवशी रावणावर विजय मिळवला . पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस.
शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.
*आपट्याच्या पानांचे महत्व का ?*
फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे ‘कौत्स’ नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, “मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? तुम्ही मागाल ते मी देईन. ” ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.
कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.
कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी आनंदाने ते घेण्यास नकार दिला . ते सोने परत घेण्यास राजाने पण नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या. लोकानीं त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.





