जोरदार पावसाची पर्वा न करता सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर सखोल महास्वच्छता मोहीम यशस्वी
नवी मुंबईकरांनी जपली स्वच्छतेविषयी बांधिलकी
विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : केंद्र सरकारमार्फत स्वच्छ भारत मिशनच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या कालावधीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दिवशी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोणताही उपक्रम नागरिकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही हे लक्षात घेत प्रत्येक उपक्रमात लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे.
असाच स्वच्छता विषयक मोठा उपक्रम आज रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सायन पनवेल महामार्ग आणि ठाणे बेलापूर मार्ग या शहरातील दोन महत्वाच्या मुख्य मार्गांवर सखोल महास्वच्छता मोहीमेच्या स्वरूपात राबविण्यात आला. मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडत असूनही सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या सखोल महास्वच्छता मोहीमेत 7 हजाराहून अधिक स्वच्छताप्रेमी नागरिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत शहर स्वच्छतेविषयीची आपली बांधिलकी दाखवून दिली.
विशेष म्हणजे या सखोल महास्वच्छता मोहीमेत डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग यांचे 5 हजारहून अधिक श्रीसदस्य हे पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महामार्ग सखोल स्वच्छता महामोहीमेत सक्रिय सहभागी झाले होते.
अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्यासह उरणफाटा येथे स्वच्छता कार्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित असलेले घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ.अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे तसेचमोठ्या संख्येने उपस्त्थि श्रीसदस्य व नागरिकांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली व मोहीमेस सकाळी 7 वा. सुरूवात झाली.





