आजच्या घडीला गरज आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची. कबुतरांवर नियंत्रण ठेवणं, त्यांच्या संख्येवर मर्यादा घालणं, दाणापाणी केंद्रांचं नियमन करणं आणि जनजागृती करणे हे अत्यावश्यक आहे. धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक आरोग्य यामध्ये संतुलन राखूनच या समस्येवर उपाय शोधणे आवश्यक आहे.
कबुतरे ही शांततेचे प्रतीक मानली जातात. अनेक धार्मिक व सांस्कृतिक परंपरांमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. भारतात अनेक ठिकाणी लोक कबुतरांना दाणे टाकतात, त्यांची काळजी घेतात. मात्र, या कबुतरांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यसंकटांकडे फारसा गांभीर्याने पाहिलं जात नाही.
कबुतरांची विष्ठा, पिसं आणि अंगावरचे जंतू यामुळे Histoplasmosis, Cryptococcosis, Psittacosis यांसारखे श्वसनविकार होऊ शकतात. विशेषतः वृद्ध, लहान मुले व दम्याचे रुग्ण यांना या आजारांचा जास्त धोका असतो. याशिवाय, त्यांच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधीही वाढते.
या विषयावर राजकीय आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही मतभेद दिसून येतात. अनेकदा कबुतरांना दाणे टाकणे हे धार्मिक कृत्य मानले जाते, त्यामुळे प्रशासन त्यावर कारवाई करताना सावध भूमिका घेतं. काही नेते याचा वापर लोकांना आकर्षित करण्यासाठी करतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं.
प्रशांत भोसले





