संविधानाचे मूल्य आत्मसात करून न्याय देण्यासाठी सज्ज व्हा – सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नाशिक, दि. 27 सप्टेंबर 2025 :
भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आणि नीतिमूल्ये नागरिकांसाठी पथदर्शक आहेत. विधी शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी या मूल्यांचा स्वीकार करावा आणि प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत सज्ज रहावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एनबीटी विधी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरन्यायाधीश गवई यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेले भाषण प्रेरणादायी ठरले. त्यांनी सांगितले की, “माझी शालेय शिक्षणाची सुरुवात एका महापालिका शाळेतून झाली. मी आज जे काही आहे, त्याचे सर्व श्रेय भारतीय संविधानाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांना आहे.”
ते पुढे म्हणाले, “संविधानाची उद्देशिका हे केवळ दस्तऐवजीकरण नाही, तर ती आपल्याला मार्ग दाखवणारी प्रकाशकिरण आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पष्ट ध्येय निश्चित करावे. उच्च ध्येय ठेवून परिश्रम घेतल्यास यश निश्चित आहे.”
कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीचा उल्लेख करत न्यायमूर्तींनी विद्यार्थ्यांना देशसेवा व समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान संविधान उद्देशिकेच्या कोनशीलेचे अनावरण सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाबाबत संस्थेच्या वतीने गौरव व्यक्त करण्यात आला. संस्थेच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना गवई यांच्या साधेपणाची आणि न्यायप्रवृत्तीची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.





