कोल्हापुरातील पत्रकार माउंट आबू येथील आंतरराष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्ससाठी रवाना – शिवनाथ बियाणी यांच्याकडून शुभेच्छा
कोल्हापूर – माउंट आबू (राजस्थान) येथे दरवर्षी आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय मीडिया कॉन्फरन्स यंदाही मोठ्या उत्साहात होत आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्यालयात होणाऱ्या या राष्ट्रीयस्तरीय परिषदेसाठी कोल्हापूरसह गारगोटी, भुदरगड परिसरातील ‘अनुबोध’ समूहाचे पत्रकार रवाना झाले.
या प्रसंगी रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत सांगितले, “या कॉन्फरन्समधून कोल्हापुरातील मीडिया विश्वात सकारात्मकता निश्चितच वाढेल.”या परिषदेविषयी माहिती देताना ज्येष्ठ साधक रघुनाथ भाई म्हणाले, “भारतातील तीन हजारांहून अधिक पत्रकारांसाठी ही राष्ट्रीयस्तरीय मीडिया कॉन्फरन्स दरवर्षी आयोजित केली जाते. माध्यम विश्वात सकारात्मकता रुजवण्यासाठी राजयोग तसेच इतर अध्यात्मिक पैलूंवर आधारित मार्गदर्शन या परिषदेमध्ये दिले जाते.”
अनुबोध चे संपादक मिलिंद प्रधान यांनी सांगितले, “नेहमी तणावाखाली असणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील लोकांसाठी ही एक सकारात्मक ऊर्जा देणारी अनुभवसंपन्न परिषद ठरेल.”
आरोग्यमित्र पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी कोल्हापूरच्या आठवणीप्रमाणे आयुर्वेदात अत्यंत महत्त्व असलेल्या महाळूंग वृक्षाचे रोप रघुनाथ भाई आणि प्रधान यांच्याकडे सुपूर्त केले, जे माउंट आबू येथे लावले जाणार आहे.या वेळी तुषार भिवटे यांच्यासह कोल्हापूर, शेणगाव व भुदरगड परिसरातील पत्रकार प्रतिनिधी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.





