या मुसळधार पावसामुळे सुमारे ११५ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली
सांगली (जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ):
मिरज तालुक्यातील गुंडेवाडी आणि परिसरात मागील २४ तासांहून अधिक काळ मुसळधार पावसाचे थैमान पाहायला मिळाले. या मुसळधार पावसामुळे सुमारे ११५ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली असून, गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यांना पूर आल्याने गुंडेवाडी – मालगाव या गावांचा परिसर बाहेरील जगापासून तुटला आहे.
गुंडेवाडी, खंडेराजुरी, कुटकुळी आणि एरंडोली या गावांचा मिरज शहराशी संपर्क तुटल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्य रस्ते जलमय झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा लागत आहे.
पूरसदृश स्थितीमुळे ओढ्यांच्या शेजारील शेतजमिनींवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रशासनाने सतर्कता बाळगून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. मिरज ग्रामीण पोलीस विभागाने ओढ्यावरून जाणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना सावधतेचे फलक लावले असून, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.






