:मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार व शालेय शिक्षण मंत्री मा.श्री. दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डॉ.दत्तात्रय घुगरे
पेठ वडगाव, ता. २२: येथील स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, मिणचे मुख्याध्यापक डॉ. दत्तात्रय श्रीधर घुगरे यांना महाराष्ट्र शासनाच्या “क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार व शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दादाजी भुसे यांच्या हस्ते झालेल्या मुंबई येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार डॉ. घुगरे यांना प्रदान करण्यात आला.
या वेळी विद्यालयाच्या सचिव व मुख्याध्यापिका सौ. एम. डी. घुगरे, पर्यवेक्षक एस. जी. जाधव, प्रा. चंद्रकांत बागणे, डॉ. शिवराज घुगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. घुगरे यांच्या नेतृत्वाखाली शाळेत एक लाख चार हजार चारशे चाळीस सूर्यनमस्कारांचा विक्रमी उपक्रम, ५५५ विद्यार्थ्यांसह शिवचरित्र पारायण, तसेच ११११ विद्यार्थ्यांसह संविधान पारायण असे असामान्य व प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४२३ राष्ट्रीय, २७९० राज्यस्तरीय व ४६७० जिल्हास्तरीय खेळाडू घडले असून, ते राज्यस्तरीय अभ्यासक्रम समितीचे तज्ज्ञ सदस्य म्हणूनही कार्यरत राहिले आहेत.
शिक्षणासोबत सामाजिक कार्यातही त्यांची विशेष आघाडी राहिली आहे. त्यांनी अनेक गरजू, गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांचे शिक्षण विनामूल्य केले आहे. हजारो वृक्षांची लागवड, पर्यावरण संवर्धन, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य हे त्यांचे समाजोपयोगी कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
त्यांच्या नेतृत्वाखालील संस्थेने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” स्पर्धेत जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली. याशिवाय डॉ. घुगरे हे अनेक शैक्षणिक व क्रीडा संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल शासनाने घेतली आहे.






