भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या काळात मुंबईमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात पुढील तीन तास महत्त्वाचे असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या या गंभीर इशाऱ्यामुळे मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी खूप गरज असेल तरच या 3 तासांच्या कालावधीत घराबाहेर पडावे. सकाळी साडेसातच्या सुमारास हा इशारा दिला आहे.
जोरदार वाऱ्यांमुळे झाडे पडणे किंवा जुन्या, धोकादायक इमारतींचे भाग कोसळणे अशा दुर्घटनांची शक्यता असते. त्यामुळे नागरकांनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. शक्य असल्यास प्रवास टाळावा. समुद्रकिनाऱ्याजवळ किंवा पाणी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि पुढील काही तास दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.





