‘सांसद खेल महोत्सव’ सांगता समारंभात पंतप्रधान मोदींचा युवा खेळाडूंशी थेट संवाद

कोल्हापूर (पेठवडगाव) : आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित ‘सांसद खेल महोत्सव’चा सांगता समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युवा खेळाडूंशी थेट संवाद साधला आणि त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
पंतप्रधान मोदींनी आपल्या संभाषणात खेळाडूंना शिस्त, संयम आणि एकाग्रता या मूल्यांचे महत्त्व सांगितले. मैदानावर जपलेली शिस्त विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ अभियानामुळे गावागावातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आणि ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी कु. वैष्णवी पाटील (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती, रग्बी खेळाडू), कु. कल्याणी पाटील (राष्ट्रीय खेळाडू, छत्रपती शिवाजी पुरस्कार प्राप्त), तसेच प्रणव पाटील / प्रणव जाधव (राष्ट्रीय खेळाडू) यांनी आपल्या क्रीडा अनुभवांचे मनोगत मांडले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये श्री. पृथ्वीराज धनंजय महाडिक (जिल्हाध्यक्ष, धनंजय महाडिक युवाशक्ती), श्री. सिद्धार्थ शिंदे (राज्यपाल नियुक्त मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य, शिवाजी विद्यापीठ), डॉ. दत्तात्रय घुगरे (प्राचार्य, आदर्श विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज), सौ. महानंदा दत्तात्रय घुगरे (सचिव, आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज), श्री. उमेश पाटील (NIS) – समन्वयक, सांसद खेल महोत्सव, मा. डॉ. डी. एस. घुगरे (संस्थापक अध्यक्ष), सौ. एम. डी. घुगरे (सचिव तथा मुख्याध्यापिका, आदर्श गुरुकुल विद्यालय), व्ही. एस. डोईजड (मुख्याध्यापक, ग्रीन व्हॅली स्कूल), सचिव मनोहर परीट, क्रीडा समन्वयक शिवाजी पाटील, तसेच नरेंद्र कुपेकर, एस. एस. मदने, आर. के. डोंबे यांचा समावेश होता.

संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. डी. एस. घुगरे यांनी सांगितले की अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळवतात. खेळातून आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि शिस्त यांचा विकास होतो.
महोत्सवात हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर इंगवले यांनी केले, तर आभार मानून समारंभाची सांगता शिवाजी पाटील यांनी केली.





