स्वराज्याचा स्वाभिमान’ छत्रपती संभाजी महाराज – मुख्यमंत्री फडणवीसांचे गौरवोद्गार; इचलकरंजीत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी:
इचलकरंजी शहरातील श्री शंभुतीर्थ चौकात स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुतळ्याला विनम्र अभिवादन करत छत्रपती संभाजी महाराजांना ‘स्वराज्याचा स्वाभिमान’ म्हणून गौरविले.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “देशधर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रम, त्याग आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. हा पुतळा केवळ शिल्प नसून स्वराज्याच्या अस्मितेची साक्ष आहे.” अशा शब्दांत त्यांनी महाराजांच्या कार्याचे स्मरण केले. इचलकरंजी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आजही जिवंत असल्याचे सांगत, या शहराला स्वराज्याची परंपरा लाभल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, CBSE अभ्यासक्रमात हिंदवी स्वराज्याचा इतिहास समाविष्ट झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी संभाजी भिडे गुरुजी यांनी आपल्या भाषणात, “महाराजांचे धर्म आणि राष्ट्रासाठीचे समर्पण अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांवर चालणे आणि त्यांच्या आदर्शांचे पालन करणे हीच खरी श्रद्धांजली आहे,” असे प्रतिपादन केले.
खासदार धैर्यशील माने यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य व बलिदानाचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी या पुतळ्यामुळे इचलकरंजीच्या वैभवात भर पडल्याचे नमूद करत, हा पुतळा नागरिकांसाठी स्फूर्तीचे केंद्र ठरेल, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो’ अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह स्थानिक आमदार, महापौर, नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिक व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





