रुकडीत आचार्यरत्न १०८ बाहुबली महाराज जयंतीनिमित्त भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन
रुकडी : परमपूज्य शांतमुर्ती, चारित्र्य रत्नाकर, समाधी सम्राट, आचार्यरत्न श्री १०८ बाहुबली महाराजजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. १६ रोजी अष्टापद तीर्थक्षेत्र, रुकडी येथे भक्ती, श्रद्धा व अध्यात्माने परिपूर्ण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पावन प्रसंगी तीर्थ प्रणेती गणिनी आर्यिका १०५ मुक्तीलक्ष्मी माताजी व आर्यिका १०५ सुप्रभा माताजी यांच्या मंगलमय सानिध्यात संपूर्ण तीर्थक्षेत्र आध्यात्मिक वातावरणाने भारावून जाणार आहे.
कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ठीक ७ वाजता भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ तीर्थकरांच्या पंचामृत अभिषेक व महाशांती धाराने होणार असून, त्यानंतर ९ वाजता ध्वजारोहण संपन्न होईल. पुढे आचार्यरत्न श्री १०८ बाहुबली महाराजांच्या मूर्तीचा पंचामृत अभिषेक, त्यांच्या जीवनकार्यावर आधारित संगीतमय अष्टक सादरीकरण तसेच त्यांच्या तपश्चर्या, संयम व अहिंसेच्या संदेशावर विचारमंथन करण्यात येणार आहे.
यावेळी तीर्थ प्रणेती गणिनी आर्यिका १०५ मुक्तीलक्ष्मी माताजी यांचे प्रेरणादायी व मंगलमय प्रवचन होणार असून, सकाळी १०.३० वाजता माताजींची आहारचर्या व त्यानंतर तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आचार्यरत्न श्री १०८ बाहुबली महाराजजी यांच्या त्याग, तप व अहिंसेच्या अमूल्य विचारांचे स्मरण करून देणाऱ्या या जयंती सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन अष्टापद तीर्थक्षेत्र, रुकडी येथील ट्रस्टी मंडळाने सर्व श्रावक-श्राविकांना केले आहे.





