
गडमुडशिंगी (ता करवीर) येथे श्री धुळसिद्ध देवांच्या नगर प्रदक्षिणेत जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आलेल्या फुलांच्या आणि भंडाऱ्याच्या उधळणीत असा परिसर सोनेरी झाला होता.
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे श्री. धुळसिद्ध देवांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी भव्य मिरवणुकीने आगमन सोहळा बुधवारी संपन्न झाला.
सुशोभित ट्रॅक्टरमधून नूतन मूर्ती कमानीजवळ पोहोचताच गजनृत्य, धनगरी ढोल- कैताळ, बासरी, कांबळेचे निशाण, छत्री, अब्दागिरी व विविध गावांच्या वालुग मंडळांच्या उपस्थितीत मिरवणुकीची भव्य दिव्य सुरुवात झाली. यावेळी अंगरखा ,धोतर, फेटा नेसून खांद्यावर कांबळे घेतलेल्या पारंपरिक वेषातील प्रमुख देवऋषींसोबत देवी देवतांची भेट घेत नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी चार जेसीबींमधून फुलांची आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. महिलांनी मोठ्या संख्येने गारवा (शिदोरी)आणला होता. गावातील मंडळांकडून आंबील, कोकम, सरबत आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले.मिरवणूक मार्गावर सर्वत्र आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुलांच्या पायघड्या टाकून भाविकांचे स्वागत करण्यात आले. मूर्तीवर सतत फुलांची उधळण होत राहिल्याने संपूर्ण वातावरण पवित्र आणि भक्तिमय बनले.गावातील सर्व देवी-देवतांना भेटी देवून देवींची ओटी भरण्यात आली. मिरवणुकीत गावातील सरपंच, उपसरपंच, सर्वपक्षीय कार्यकर्ते, युवक, महिला, तसेच सर्व समाजघटकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सायंकाळी भव्य आतिषबाजी करून धनगरी ओव्याने जागर पार पडला. शुक्रवारी विधिवत श्री .धुळसिद्ध मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे.





