श्रीदत्तात्रयांचे अस्तित्व अणि महत्व
सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी डॉ. उमेश सुतार
महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा अणि त्यातून झालेली
वाड्मयाची निर्मिती म्हणजे भक्तांना पर्वणी होय, या साहित्यातून नेहमीच भगवंताच्या विविध रूपांचे दर्शन घडत आले आहे, संत साहित्यात, साहित्यकारास आकलन झालेल्या इष्ट देवतेची अप्रतिम वर्णने आढळतात, श्रीदत्तात्रेयांचे उपासक दासोपंत यांनी केलेली सहित्य निर्मिती ही अत्यंत उच्च कोटीची आढळते.
अंबेजोगाईला दासोपंतांनी दत्त मंदिर बांधून तिथेच त्यांनी “पदार्णव, गीतार्णव, पासोडीवर काव्यलेखन, सोळा दत्त अवतारांची माहिती या सारख्या अनेक ग्रंथाची निर्मिती केली, जी आजही अनेकांच्या ज्ञानात भर घालते आहे.
पुढे प.पू श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी हे आंबेजोगाईस आले अणि दासोपंतांच्या साहित्याचा सोप्या भाषेत अनुवाद करुन, भक्तांना सहज कळेल अशी साहित्य निर्मिती केली.
श्रीदत्तात्रेय हे महाराष्ट्रात अत्यंत पूज्यनीय दैवत आहे, अनेक संप्रदायांनी श्रीदत्तात्रेयांच्या भक्तीचा प्रचार अणि प्रसार केला, शैव, वैष्णव, शाक्त यांच्यातील अंतर वाढू लागले, तेव्हा श्रीदत्तसंप्रदायाने धर्म अखंड ठेवून अधिक समृध्द केला. श्रीदत्तात्रेयांची त्रिमूर्ती उपासना ही त्याचेच प्रतीक आहे. ग्रंथकारास झालेली अनुभूती ही सगुण साकार भक्तिचे द्योतक आहे, हे हिंदु संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
अत्रिऋषी अणि अनुसया मातेचे पुत्र म्हणून श्रीदत्तात्रेय हे सर्वश्रुत आहेत, त्यानंतरच्या काळात श्रीदत्तात्रेयांचे सोळा अवतार हे श्रीदत्तात्रयांचे अस्तित्व अणि महत्व दर्शवितात.
दत्तात्रेयांचे सोळा अवतार :-
१) योगिराज :-
ब्रम्हदेवाचे मानसपुत्र अत्रि पत्नी अनुसये समवेत पुत्र प्राप्तीसाठी हिमालयात कठोर तपश्चर्या करीत असतांना भगवंत प्रसन्न होऊन कार्तिक शुक्ल: पौर्णिमेला प्रकट झाले. दत्तात्रेयांनी योगमार्ग अवलंबिला अणि प्रसार केल्यामुळे दत्तात्रेयांचा हा अवतार एकमुखी चतुर्भुज व साक्षात विष्णु असल्याने “योगिराज” म्हणून वर्णिला आहे.
२) अत्रिवरद :-
अत्रिऋषींच्या ऋक्ष पर्वतावरील परमतीर्थावर १०० वर्षे तपश्चर्येला वरदान म्हणून ‘अत्रिवरद’ या नावाने योगिराज अवतरले. ब्रम्हा, विष्णु व महेश त्रिमूर्ती रुपात अत्रिं पुढे कार्तिक कृष्ण प्रतिपदेस प्रकटले. तिन्ही तत्व हे एकाच भगवंताचे अंश आहेत.
३) दत्तात्रेय :-
अत्रिवरदाने अत्रिऋषींना वरदान विचारले असता, तुमच्या सारखाच पुत्र असावा असे वरदान मागताच भगवंत बालरुपात कार्तिक कृष्ण द्वितीयेला प्रकटले.
४) कालाग्निशमन :-
औरस पुत्र प्राप्ती करीता अत्रिऋषींनी उग्र तप केल्याने शरीरात कालाग्नी निर्माण होऊन दाहकता वाढल्याने, त्याचे शमन करण्यासाठी भगवंताने शीतल रुप घेऊन मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला प्रकटले म्हणून ‘कालाग्निशमन’.
५) योगीजनवल्लभ :-
कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष आले, म्हणून दत्तात्रेयांनी बालरुपाचा त्याग करुन, सर्व योगीजनांना प्रिय रुप धारण करुन, ‘योगिजनवल्लभ’ योगीरुपात मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला अवतरले.
६) लिलाविश्वंभर :-
ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोक कल्याणासाठी पौष शुध्द पौर्णिमेला लिलाविश्वंभर अवतार घेऊन आपल्या अद्भुत लिलांनी कल्याण केले.
७) सिद्धराज :-
दत्तात्रेयांनी कुमार रुपात माघ शुध्द पौर्णिमेला अवतारित होऊन अनेक ऋषी मुनींना प्राप्त सिध्दींचे गर्वहरण करुन योगदिक्षा प्रदान केली, तो दत्तात्रेयांचा ‘सिध्दराज’ अवतार.
८) ज्ञानसागर :-
सिध्दी प्राप्त योगींना त्याचा महत्वाकांक्षा नसावी त्यांना हा मार्ग दाखविण्यासाठी दत्तात्रेयांनी फाल्गुन शुद्ध दशमीला ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी ‘ज्ञानसागर’ नावाने अवतार घेतला
९) विश्वंभरावधूत:-
सिध्दांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी ‘विश्वंभरावधूत’ या नावाचा अवतार घेवून चैत्र शुद्ध पौर्णिमेला बीज मंत्रांचा उपदेश केला.
१०) मायामुक्तावधूत:-
भक्तांची भक्ति अणि श्रध्दा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी वैशाख शुद्ध चतुर्दशीला ‘मायामुक्तावधूत’ अवतार घेतला.
११) मायायुक्तावधूत :-
भक्तांची गुरु वरील विपरीत परस्थितीत श्रध्देची परीक्षा घेवून, योग्य संदेश देण्यासाठी दत्तात्रेयांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला योगमाया रुपात ‘मायायुक्तावधूत’ अवतार वर्णिला आहे.
१२) आदिगुरु :-
मदालसेचा पुत्र ‘अलर्क’ यास योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी आषाढ शुध्द पौर्णिमेला आदिगुरु रुपात अवतार धारण केला.
१३) शिवगुरु :-
काळ्या आवळीच्या वृक्षाखाली श्रावण शुद्ध अष्टमीला शिवरुपात दत्तात्रेय प्रगटले, तो ‘शिवगुरु अथवा शिवदत्त’ नावाचाअवतार. या अवतारात दत्तात्रेयांनी सनातनी ब्राम्हणाला वर्णाश्रमाचे थोतांड अणि वैराग्ययुक्त पंचमाश्रमाचा उपदेश केला.
१४) देवदेवेश्वर :-
देवता, ऋषी, तपस्वी इत्यादींना अनुग्रहीत करण्यासाठी माहीत क्षेत्री
दत्तात्रेयांचा ‘देवदेवेश्वर’ नावाचा अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला प्रकटला
१५) दिगंबर :-
दत्तात्रेयांचा ‘दिगंबर’ अवतारात यदुराजास आपल्या २४ गुरुं पासून प्राप्त ज्ञानाचे अवलोकन करण्यासाठी आश्विन शुद्ध पौर्णिमेला अवतरला
१६) श्रीकृष्णश्यामकमललोचन :-
सर्व देव,धर्म,सृष्टी इत्यादींची विविधता ही कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ‘श्रीकृष्णश्यामकमललोचन’ रुपात भक्तांना एकच भक्तिमार्गाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला.
या सोळा दत्त अवतारांचा दत्त उत्सव हा संपूर्ण हिंदुस्थानात केवळ अंबेजोगाईला विशेष मुहूर्तावर साजरा केल्या जातो, दासोपंतांच्या अंबेजोगाई येथील ” देवघर” या मंदिरात आजही पंचधातूतील या सोळा दत्त अवतारांच्या मूर्ती भक्तांना दर्शनास उपलब्ध आहेत,
वरील सोळा अवतारांचे अवलोकन केल्यास त्यांचे षोडशकलांशी म्हणजेच गुणांचे साधर्म्य असल्याचे जाणविते, कारण अवतार हे विशिष्ट कार्यासाठी, विशिष्ट गुणधर्म अंगीकृत असलेले असतात.
तिन्ही लोकाची रचना अणि महत्वाच्या आदि तत्वांनी युक्त १६ कलांनी परिपूर्ण असा पौरुष अर्थात मनुष्य शरीराचा भगवंताने स्वीकार केला.





