गारगोटी एस.टी. आगारात विद्यार्थिनींची स्वच्छता मोहीम व मेकॅनिकल वर्कशॉपची क्षेत्रभेट
गारगोटी : डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, गारगोटीच्या श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींच्या वतीने गारगोटी एस.टी. आगार व मेकॅनिकल वर्कशॉप येथे स्वच्छता मोहीम व क्षेत्रभेट कार्यक्रम आज उत्साहात पार पडला.
क्षेत्रभेटीचे प्रस्ताविक करताना सुशांत माळवी सर यांनी एस.टी. बस ही ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी महत्वाची जीवनवाहिनी असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींसाठी सुरू असलेली अहिल्याबाई होळकर मोफत एस.टी. पास योजना ही मुलींच्या शिक्षणाला बळ देणारी योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शालेय जीवनात एस.टी. चे मोठे योगदान असून, त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक विद्यार्थीाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थिनींनी एस.टी. स्टँड परिसरात स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जपली. हेड मेकॅनिकल प्रमोद सावंत यांनी मुलींना मेकॅनिकल वर्कशॉपची संपूर्ण माहिती देत विविध तांत्रिक प्रक्रियांची ओळख करून दिली. गारगोटी आगाराचे डेपो मॅनेजर अनिकेत चौगुले यांनी एस.टी. आगारातील विविध विभाग, प्रवासी सुविधा, हेल्पलाइन तसेच विविध योजनांची माहिती विद्यार्थिनींना सांगितली. प्रशालेच्या भेटीनिमित्त आगार प्रशासनाकडून शाळेला एस.टी. बसचा फोटो असलेली आकर्षक फ्रेम देण्यात आली.
कार्यक्रमाला सौ. वनिता मोरूस्कर, नंदकुमार सांडूगडे, संतोष जाधव, संतोष पाटील, कृष्णा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सौ. सुचिता कारेकर यांनी मानले.या उपक्रमासाठी कॅम्पस डायरेक्टर अभिजीत माने व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. आर. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.





