केमन आयलंड येथील आंतरराष्ट्रीय शेफ स्पर्धेत 300 स्पर्धकांमधून चमकदार कामगिरी

कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतल्या साध्या कुटुंबात जन्मलेला जितेंद्र सर्जेराव करंबे हा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट शेफ म्हणून नावाजला गेला आहे. केमन आयलंडमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय शेफ स्पर्धेत 300 स्पर्धकांमधून चमकदार कामगिरी करत त्याने हा मानाचा बहुमान पटकावला.
बेताच्या परिस्थितीत आई-वडील व दोन भावांसह वाढलेला जितेंद्र लहानपणापासून मेहनती, जिद्दी व कष्टाळू. महाराष्ट्र हायस्कूलपासून विवेकानंद कॉलेजपर्यंत शिक्षण घेताना त्याने एनसीसी, ज्युडो, फेन्सिंग अशा खेळात राज्य व राष्ट्रीय स्तरावर मेडल्स मिळवली. मात्र खेळातील राजकारणामुळे दिशा बदलावी लागली आणि त्याने हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील डी. वाय. पाटील येथे शिक्षण घेताना दिवस–रात्र काम करून त्याने कुकिंगची आवड साधनेत रूपांतरित केली.
पुढे जगातील थर्ड टॉप कोस्टा कंपनीमध्ये शेफ म्हणून त्याची निवड झाली. अनेक वर्षे युरोप, दक्षिण अमेरिका, केरेबियन देशात काम करत त्याने इटालियन, स्पॅनिश, मॅक्सिकन व इंडियन फूडमध्ये पारंगतता मिळवली. चवीची ताकद, कष्टाची तयारी आणि प्रसंगाशी झुंज देण्याची वृत्ती यामुळे जितेंद्रने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.
केमन आयलंडमध्ये काम करताना तो केवळ स्वतःचे करिअर घडवत नाही तर अनेक तरुणांना मार्गदर्शन आणि परदेशात नोकरीच्या संधीही उपलब्ध करून देतो. गरीब घरातून सुरू झालेला त्याचा प्रवास आज प्रेरणादायी आदर्श ठरला असून, ‘कोल्हापूरचा पट्ठ्या ते आंतरराष्ट्रीय शेफ’ हा अभिमानास्पद प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.






