लोकनेते स्व. बाळासाहेब माने यांच्या स्मृतीतून समाजउन्नतीचा नवा मार्ग : उपमुख्यमंत्री शिंदे
रूकडी येथे ‘स्व. बाळासाहेब माने प्रवेशद्वार’ लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
रूकडी (ता. ९): “स्व. बाळासाहेब माने यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. त्यांच्या कार्यातून समाजउन्नतीचा नवा मार्ग तयार झाला आहे. ते खरे लोकनेते होते,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
रूकडी येथे ‘लोकनेते स्व. बाळासाहेब माने प्रवेशद्वार’ लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिंदे यांनी स्व. माने यांच्या कार्याचा गौरव करत म्हटले की, “माने साहेबांनी ‘मला काय मिळाले’ यापेक्षा ‘मी जनतेला काय दिले’ असा विचार आयुष्यभर जोपासला. ग्रामपंचायतीपासून संसदपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे जनतेचे प्रतिनिधित्व केले. पाच वेळा खासदार राहून त्यांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला.”
ते पुढे म्हणाले, “बाळासाहेब माने यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. मराठा समाजात त्यांनी जागृती घडवली. रूकडीतील ही कमान म्हणजे त्यांच्या कार्याचे जिवंत स्मरणचिन्ह आहे आणि समाजाला प्रेरणा देणारी ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
या वेळी ग्रामपंचायत रूकडी आणि अतिग्रे ग्रामपंचायत यांच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत खासदार धैर्यशील माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मानले.
कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार निवेदिता माने आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





