इचलकरंजीतील दहशत माजवणारे सहा गुंडांवर ‘मोका’ची कारवाई; गुन्हेगारीला पोलिसांचा सणसणीत दणका
इचलकरंजी: शहरासह परिसरात खुनी हल्ले, जबरदस्तीची चोरी, खंडणी आणि सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून आपली दहशत निर्माण करणाऱ्या ‘एस. एन. गँग’वर पोलिसांनी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ अर्थात ‘मोका’ (MCOCA) कायद्याखाली कारवाई केली आहे. टोळीचा म्होरक्या सलमान राजू नदाफसह (वय २५) सहा जणांवर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे इचलकरंजीतील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. म्होरक्या सलमान राजू नदाफ (रा. परीट गल्ली, गावभाग) याच्यासह अविनाश विजय पडीयार, अरसलान यासीन सय्यद, यश संदीप भिसे, रोहित शंकर आसाल आणि अनिकेत विजय पोवार यांचा समावेश असलेल्या या टोळीवर एकूण १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसारख्या प्रकरणांचा समावेश आहे. केवळ म्होरक्या नदाफवर तब्बल १२ गुन्हे नोंद आहेत.
या कारवाईला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे. नुकतेच या टोळीने गावभाग परिसरात फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेवर खुनी हल्ला केला होता, तसेच त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाईचा प्रस्ताव तयार केला.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या निर्देशानुसार अप्पर अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गावभाग पोलिसांनी मोका कारवाईचा प्रस्ताव सादर केला. या कारवाईमुळे इचलकरंजी पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे भयमुक्त जीवन सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांचे हे मोठे पाऊल आहे.





