‘महायुतीत मिठाचा खडा नको’; शिंदे यांचा दिल्लीतून महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट संदेश, पंतप्रधान मोदींची भेट
नवी दिल्ली: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (२५ ऑक्टोबर २०२५) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. तसेच, या भेटीतून त्यांनी राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या ‘महायुतीमधील बेबनावा’च्या चर्चांवर थेट भाष्य करत, सर्व नेत्यांना कठोर संदेश दिला.
विचारांची युती: महायुतीत बेबनाव नाही
माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि राज्यात असलेली महायुती ही केवळ सत्तेची नसून, विचारांची युती आहे आणि विकासाच्या एकाच अजेंड्यावर ती पुढे जात आहे. त्यामुळे महायुतीत कोणताही बेबनाव नाही आणि सर्व घटक पक्ष एकसंध आहेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पंतप्रधान मोदींनीही एनडीएच्या विकासाच्या भूमिकेवर भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
‘मिठाचा खडा’ पडू देऊ नका!
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांना मोलाचा सल्ला दिला. “महायुतीत कुठेही मतभेद होता कामा नयेत, मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकानं घ्यावी. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. पक्षाकडून धंगेकरांना योग्य तो निरोप दिला असून, महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बेबनाव होईल असे कोणतेही कृत्य किंवा वक्तव्य करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांमध्ये समन्वय राखण्यावर नेतृत्वाने भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भेट अचानक नसून, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी होती आणि पंतप्रधानांसोबत राज्याच्या विकासावर चर्चा झाली, असे शिंदे यांनी नमूद केले.





