दक्षता जनजागृती सप्ताह: २७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर – ‘दक्षता आपली सामायिक जबाबदारी’
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राज्यात व्यापक कार्यक्रम; कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विशेष जनजागृती अभियानाचे नियोजन
कोल्हापूर: केंद्रीय दक्षता आयोगाच्या (Central Vigilance Commission, नवी दिल्ली) निर्देशानुसार, भ्रष्टाचार विरोधात समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यात २७ ऑक्टोबर २०२५ ते ०२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षी सप्ताहाची संकल्पना “दक्षता: आपली सामायिक जबाबदारी” (Vigilance: Our Shared Responsibility) ही ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे सर्व विभाग, त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालये, उपक्रम आणि स्वायत्त संस्थांमार्फत सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे.
सरकारी कार्यालयांत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ:
सप्ताहाच्या निमित्ताने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली जाणार आहे. शपथ घेतल्यानंतर मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य आणि मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा या सप्ताहानिमित्तचा संदेश वाचून दाखवण्यात येईल. तसेच, हा संदेश राज्यातील जनतेसाठीही प्रसृत करण्यात येणार आहे.
कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष कार्यक्रम:
भ्रष्टाचार विरोधात अधिक प्रभावी जनजागृती व्हावी या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Bureau), कोल्हापूर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात खालीलप्रमाणे विशेष कार्यक्रमांचे नियोजन केले आहे:
१. प्रसारमाध्यमातून आवाहन: आकाशवाणी (कोल्हापूर), एफ.एम. रेडिओ केंद्रे आणि न्यूज चॅनेलद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीविषयी मुलाखती प्रसारित करून नागरिकांना लाचेच्या तक्रारी करण्यासाठी आवाहन केले जाईल.
२. माहितीपत्रकांचे वाटप: भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप.
३. प्रसिद्धी: स्थानिक वृत्तपत्रे, केबल चॅनेल, व्हॉट्सॲप ग्रुप, युट्युब आणि आकाशवाणीच्या मदतीने जनजागृती सप्ताहाची माहिती व पार्श्वभूमी प्रसिद्ध करणे.
४. टोल फ्री क्रमांकाची प्रसिद्धी: विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचे दर्शनी भाग, रिक्षा, एसटी, रेल्वे स्टँड आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी टोल फ्री क्र. १०६४, मोबाईल क्रमांक ९४०४३२१०६४ आणि मोबाईल ॲपबाबतचे स्टिकर्स व बॅनर्स लावून व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
५. नागरिक आणि उद्योजकांशी थेट चर्चा: स्वयंसेवी संस्था, अशासकीय संघटना, स्वातंत्र्य सैनिक, महिला संघटना, वाहन चालक-मालक संघटना, कामगार संघटना तसेच एम.आय.डी.सी. येथील कारखानदारांना भेटी देऊन शासकीय योजनांचा लाभ घेताना त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्याकडे लाचेची मागणी होते काय, याबाबत चर्चा करून विचारपूस केली जाईल.
६. ग्रामीण भागांत जनजागृती: विविध सामाजिक सेवा संस्थांच्या मदतीने ग्रामीण भागांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती.
७. महिला बचत गटांना भेटी: महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी महिला बचत गटांना भेटी देऊन भ्रष्टाचार विरोधी प्रबोधन.
८. तक्रारदारांशी संवाद: जुन्या सापळा (Trap) कारवाईतील तक्रारदार आणि जागरूक नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या नवीन काही तक्रारी असल्यास त्या जाणून घेणे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या व्यापक कार्यक्रमामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात भ्रष्टाचार विरोधात तीव्र जनजागृती होण्यास मदत मिळणार आहे. नागरिकांनी ‘दक्षता: आपली सामायिक जबाबदारी’ या संकल्पनेनुसार या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





