ऑक्टोबरअखेरीस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता! – ३१ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी डॉ. उमेश सुतार
यावर्षी मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अजूनही पूर्णपणे संपलेला नसून, राज्यात २५ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने राज्यातील तब्बल ३१ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. अनेक भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्वच विभागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
विभागानुसार पावसाचा अंदाज:
* कोकण आणि मुंबई परिसर: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ आहे.
* पश्चिम महाराष्ट्र: पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
* मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे, त्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
* उत्तर महाराष्ट्र: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, या सर्व ठिकाणी ‘यलो अलर्ट’ आहे.
* विदर्भ: अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे, तसेच शेतकरी बांधवांनी काढणीस आलेल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.





