‘युवा सामर्थ्य’ हीच भारताची ताकद! नवनियुक्तांनी राष्ट्रनिर्माणमध्ये सक्रिय योगदान द्यावे – पंतप्रधान मोदी
रोजगार मेळाव्यातून देशभरातील १० लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे
नवी दिल्ली/नागपूर:
‘युवा सामर्थ्य से विकसित भारत’ या संकल्पनेला मूर्त रूप देत, केंद्र सरकारने देशभरात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत १० लाखांहून अधिक तरुणांना ‘बिना पर्ची, बिना खर्ची’ या पारदर्शक तत्त्वावर सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे दिली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या मेळाव्याला संबोधित करताना, रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सरकारची बांधिलकी अधोरेखित केली. त्यांनी भारताची युवाशक्ती आणि लोकशाही हे जगातील दोन सर्वात मोठे सामर्थ्य असल्याचे सांगितले. तसेच, रेल्वे, गृह, टपाल, आरोग्य आणि वित्तीय सेवा यांसारख्या प्रमुख मंत्रालये आणि विभागांमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांना राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
या राष्ट्रीय उपक्रमाचा भाग म्हणून, महाराष्ट्रातील नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्तांशी संवाद साधला.
गडकरींचा नवनियुक्तांना महत्त्वाचा सल्ला:
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शासकीय नोकरीला ‘देशसेवेची संधी’ मानण्याचे आवाहन केले. त्यांनी नवनियुक्तांना प्रशासनात पारदर्शकता, संवेदनशीलता आणि वेळेवर निर्णय घेण्याचे महत्त्व पटवून दिले. केवळ नोकरी मागणारे न बनता, तरुणांनी ‘रोजगार देणारे’ बनण्यासाठी उद्यमशीलतेचा स्वीकार करावा, असा महत्त्वपूर्ण संदेशही त्यांनी दिला. हा रोजगार मेळावा युवकांचे सक्षमीकरण करत त्यांना विकसित भारताच्या प्रवासात महत्त्वाचे भागीदार बनवत आहे.





