अन्न गुणवत्ता आणि कौशल्यवृद्धीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक – डॉ. महेश पाटील
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात ‘जागतिक अन्न दिन’ उत्साहात
तळसंदे/ डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या अन्न तंत्रज्ञान विभागातर्फे ‘जागतिक अन्न दिन’ (World Food Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित एकदिवसीय कार्यशाळा व अन्न पदार्थ सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन ऐविज फूड प्रा. लि., सांगलीचे कार्यकारी संचालक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते झाले.
डॉ. पाटील यांनी यावेळी बोलताना, अन्न पदार्थांची गुणवत्ता वाढविण्यासोबतच कौशल्यवृद्धीवर विशेष भर देणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. पौष्टिक आणि गुणवत्तापूर्ण अन्न उत्पादनासाठी तरुण उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वर्षीच्या ‘जागतिक अन्न दिनाचा’ विषय “हॅन्ड इन हॅन्ड फॉर बेटर फूड अँड बेटर फु्चर” हा होता.
प्रभारी कुलगुरू डॉ. सतीश पावसकर व कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले. अन्न पदार्थ सादरीकरण स्पर्धेत अन्न तंत्रज्ञान विभागाच्या कु.श्रावणी शिंदे, कु.नेहा बामणे, प्रशांत राऊत यांना प्रथम, कु.श्रेया हलदर, अथर्व कल्याणकर व कु.श्रावणी गौरीमठ यांना द्वितीय, तर अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कु.मानसी पाटील व ओंकार बाचल यांना तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेत एकूण १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.





