“गोपाळवाडी गणाचा सर्वांगीण विकास हे ध्येय”: सौ. वैशाली रणदिवे पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक
पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
पुणे/दौंड: आगामी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गण (अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव) मधून सौ. वैशाली सदाशिव रणदिवे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जनतेच्या सेवेसाठी आणि भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सौ. वैशाली रणदिवे, रा. देवकी नगर, गोपाळवाडी, या गेल्या १२ वर्षांपासून ‘ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य’ मध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य उभे केले आहे. संस्थेमार्फत प्री-प्रायमरी स्कूल, संगणक प्रशिक्षण केंद्र, महिला बचत गट, अंगणवाडी बालवाडी कोर्सेस यांसारख्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
कमी शुल्कात संगणक प्रशिक्षण, ‘एरा किड्स प्ले स्कूल’, ‘प्रगती मॉन्टोसरी स्कूल’ यांसारखे उपक्रम संस्थेने यशस्वीपणे राबवले आहेत. तसेच, दौंड शहर व तालुक्यातील १०० हून अधिक युवक-युवतींना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यात संस्थेचे मोठे योगदान आहे. संस्थेने गोरगरिबांना मदत करणे, ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) देणे, महिला सबलीकरण व महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिरे आयोजित करणे, असे अनेक उपक्रम राबवले आहेत.
‘एकच ध्यास, गोपाळवाडी गणाचा विकास’ हे ध्येय समोर ठेवून आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे वैशाली रणदिवे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड क्रमांक ५ मधून निसटता पराभव झाला होता, परंतु संस्थेचे काम अव्याहतपणे सुरू राहिले. ज्ञानसंकल्प संस्थेशी आज सुमारे ४,००० हून अधिक सभासद जोडले गेले असून, संस्थेचे कार्य पुणे जिल्ह्यासह चार ते पाच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.
स्वच्छ आणि निर्मळ समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे कार्यही संस्था दरवर्षी करते. जनतेच्या सेवेसाठी आणि गोपाळवाडी गणाच्या विकासासाठी आपण ही पंचायत समिती निवडणूक लढवून लोकांची सेवा करणार असल्याचे सौ. वैशाली रणदिवे यांनी ठामपणे सांगितले.





