मोठी बातमी! दिल्ली पोलिसांकडून ISIS चा मोठा दहशतवादी कट उधळला; मुंबई-दिल्लीत घातपाताचा डाव
नवी दिल्ली: राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) चा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उधळून लावला आहे. या देशव्यापी कारवाईत महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश आणि दिल्लीतून ‘इसिस’शी संबंधित ५ हून अधिक संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले आफताब आणि सुफियान (मूळचे मुंबईतील रहिवासी) यांना दिल्ली रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे जात असताना ताब्यात घेण्यात आले. हे दहशतवादी स्फोटके आणि शस्त्रास्त्रांसह मुंबईत मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी संशयितांकडून IED (स्फोटके) तयार करण्याचे साहित्य, तीन पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. तपासात असे उघड झाले आहे की, या दहशतवाद्यांना पाकिस्तानी हँडलर्सकडून सोशल मीडियाद्वारे IED बनवण्याचे प्रशिक्षण मिळत होते. तसेच, या नेटवर्कचा संबंध ‘गजवा-ए-हिंद’ आणि कट्टरपंथी ‘इसिस’ विचारसरणीशी आहे.
या कारवाईमुळे मुंबई-दिल्लीत होणारा संभाव्य बॉम्बस्फोट आणि घातपात टळला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. पोलीस या दहशतवादी नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पुढील तपास करत आहेत.





