-8.1 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

आंध्र प्रदेशात स्लीपर कोचला भीषण आग; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, हैद्राबाद-बंगळूर महामार्ग हादरला

आंध्र प्रदेशात स्लीपर कोचला भीषण आग; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, हैद्राबाद-बंगळूर महामार्ग हादरला

कुरनूल (आंध्र प्रदेश): हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या एका खासगी व्होल्वो स्लीपर कोच बसला आज (शुक्रवार, २४ ऑक्टोबर २०२५) पहाटे कुरनूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुरु गावाजवळ भीषण अपघात झाला. पहाटे ३:३० च्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत बसला आग लागून किमान २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

‘कावेरी ट्रॅव्हल्स’च्या या बसमध्ये सुमारे ४० हून अधिक प्रवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, बसची एका दुचाकीला जोरदार धडक बसली. ही दुचाकी बसखाली फरफटत गेल्यामुळे घर्षणातून ठिणग्या पडल्या आणि इंधन टाकीजवळ आग लागली. एसी स्लीपर कोच असल्यामुळे आग आणि धूर वेगाने पसरला.

अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत असल्याने त्यांना बाहेर पडायला फारसा वेळ मिळाला नाही. बसचे दरवाजे आणि आपत्कालीन मार्ग (Emergency Exit) जाम झाल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. काही प्रवाशांनी खिडक्या तोडून उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने कुरनूल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना मदत आणि जखमींवर योग्य उपचाराचे निर्देश दिले आहेत. या भीषण अपघातामुळे दिवाळीच्या दिवसांत शोककळा पसरली आहे.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles