कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई: ‘खरेदीचा बहाणा’ करून सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक!
एकूण ९ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त.
कोल्हापूर: बेकरी आणि किराणा मालाच्या दुकानात खरेदीचा बहाणा करून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणाऱ्या दोन सराईत आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीची एक स्प्लेंडर मोटारसायकल, गुन्ह्यासाठी वापरलेली तवेरा चारचाकी आणि एक दुचाकी वाहन असा एकूण ९ लाख १६ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेमुळे जबरी चोरीचे दोन आणि मोटारसायकल चोरीचा एक, असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्ह्याची पद्धत आणि तपास:
गेले काही दिवसांपासून गोकुळ शिरगाव आणि शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकरी व किराणा दुकानांमधील महिलांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने हिसकावण्याचे दोन गुन्हे घडले होते. अनोळखी तरुण चारचाकी व दुचाकी वाहनावर वेगवेगळे नंबर प्लेट आणि स्टिकर्स लावून हे गुन्हे करत होते. दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांकडून दागिन्यांचा वापर वाढलेला असल्याने या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, पोलीस निरीक्षक श्री. कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ व पथकाने तपास सुरू केला. गुन्हे घडलेल्या सांगवडे व शिरोळ परिसरातील सुमारे ८० ते ९० ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरली. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या तवेरा गाडीवर नंबर व स्टिकर्स वारंवार बदलणारा मुख्य संशयित आरोपी इम्रान समसुद्दीन मोमीन (वय ३८, रा. बेघर वसाहत हेर्ले, ता. हातकणंगले) याच्यावर पथकाने लक्ष केंद्रित केले.
आरोपींना अटक:
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २०.१०.२०२५ रोजी तपास पथकाने तावडे हॉटेल ते सांगली फाटा हायवे रोडलगत, पंचगंगा नदीजवळील पीर बालेसाहेब दर्ग्याजवळ सापळा रचला. यावेळी आरोपी इम्रान मोमीन आणि त्याचा साथीदार सुदाम हणमंत कुंभार (वय ४०, रा. आंदळी, ता. पलूस, जि. सांगली) यांना तवेरा गाडीसह रंगेहात पकडण्यात आले.
सखोल चौकशीदरम्यान दोघांनी मिळून गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे (गु.र.नं. 333/2025) आणि शिरोळ पोलीस ठाणे (गु.र.नं. 322/2025) येथे दाखल असलेले जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सी.बी.एस.एस टी. स्टँड, कोल्हापूर येथून एक स्प्लेंडर मोटारसायकल चोरल्याचीही त्यांनी कबुली दिली.
जप्त मुद्देमाल आणि उघड गुन्हे:
आरोपींकडून २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (दोन लहान मंगळसूत्र), चोरीची एक स्प्लेंडर मोटारसायकल, गुन्ह्यासाठी वापरलेली तवेरा गाडी व दुसरी स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ९,१६,०५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेमुळे गोकुळ शिरगाव, शिरोळ आणि शाहुपूरी पोलीस ठाण्यातील एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार सो., मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ आणि अंमलदार प्रविण पाटील, सुरेश पाटील, हिंदुराव केसरे, रुपेश माने, दिपक घोरपडे, संजय पडवळ, अमित सर्जे, संतोष बरगे, रामचंद्र कोळी व सुशिल पाटील यांनी ही यशस्वीरित्या पार पाडली.





