कोळीगीतांच्या लयीवर रसिकांनी घेतला नृत्याचा मनमुराद आनंद

वार्ताहर – सत्याचा शिलेदार
माथेरान ता. ९ : येथील पत्रकार ख्यातीप्राप्त गायक चंद्रकांत काळे आणि त्यांचे पुत्र ओम काळे यांनी आपल्या सुरेल गायनाने गुजरातमधील सुरत येथील श्रोत्यांवर जणू संगीतमय जादूच केली. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी हनी पार्क मैदान, सुरत येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात या दोघांनी सादर केलेल्या महाराष्ट्रीय कोळीगीतांना आणि हिंदी–मराठी चित्रपटगीतांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
चंद्रकांत काळे यांचा सुमधुर आवाज आणि ओम काळे यांची दमदार साथ यामुळे संपूर्ण वातावरणात सुरांचा अभिषेक झाला. विशेषतः कोळीगीतांच्या तालावर प्रेक्षकांनी ठेका धरत नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. टाळ्यांच्या कडकडाटात दोघांचेही अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमानंतर चंद्रकांत काळे आणि ओम काळे यांनी सुरतच्या रसिक श्रोत्यांचे आभार मानले व त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेमाने ते भारावल्याचे सांगितले.
या यशस्वी कार्यक्रमानंतर रसिकांच्या आग्रहास्तव १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एकदा हनी पार्क मैदान, सुरत येथे यांचा विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या आगामी कार्यक्रमाबाबत सुरतकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





