मराठी भाषा साहित्यिकांनी जिवंत ठेवली- प्रा. दिलीप जाधव
मिरज: संजय पवार महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत साहित्यिक लेखकांनी आपल्या प्रतिभा शक्तीने शब्दकुंचल्यात पकडून मराठी भाषेची थोरवी गायली शिवाय मायमराठी चवळ यशस्वी करण्याचे काम त्यांनी केले असे मत प्रा. दिलीप जाधव यांनी बळवंत कॉलेज येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभिजात मराठी भाषा दिन व अभिजात मराठी सप्ताह च्या निमित्ताने प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर विभागात आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक सर्जेराव सावंत, अजित साळुंखे, संताजी सावंत, सविता बनसोडे उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले, आपली मराठी ही ज्ञान भाषा असून तिचा आपल्या जीवनात मातृभाषा म्हणून वापर करताना मातृभाषेचे आईकडून मिळालेले बाळकडू आजच्या पिढीने विसरता कामा नये. लोकासाहीत्यापासून आजच्या आधुनिक साहित्याचे वाचन आजच्या युवा पिढीकडून व्हावे अशी आशा व्यक्त केली. पु. ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर, अण्णा भाऊ साठे, शंकरराव खरात, तारा भवाळकर आदि साहित्यिकांच्या लेखनातील वेगवेगळे मराठी भाषेचे संदर्भ देऊन अशा लेखकांच्या साहित्याचे वाचन होणे आवश्यक असून मायमराठी चळवळ यशस्वी करण्यासाठी ‘हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू’ या उक्ती प्रमाणे मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आजच्या युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र मुजमुले यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव गुडघे आभार रुपाली बाबर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सेवक आप्पासो वानकर, संतोष कदम, स्नेहल कदम, सुवर्णा मोहिते, वैशाली जाधव, निलोफर मुलाणी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते





