ऑक्टोबरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; ५० वर्षांचा विक्रम तुटण्याची शक्यता?
सत्याचा शिलेदार | नवी मुंबई प्रतिनिधी : गणेश सुतार
मुंबई : सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे देशातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील मराठवाड्यासह इतर भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑक्टोबर महिन्याबाबत अधिक चिंताजनक माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा ११५ टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे. एवढाच नव्हे, तर या पावसामुळे गेल्या ५० वर्षांचा पावसाचा विक्रम तुटू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सामान्यतः ऑक्टोबर महिन्यात मान्सूनची तीव्रता कमी होत जाते, मात्र यंदा सप्टेंबर महिन्यात मान्सून अधिक सक्रिय राहिला. अनेक भागांत अजूनही आर्द्रतेचं प्रमाण जास्त असून, त्यामुळे ऑक्टोबरमध्येही पावसाची शक्यता वाढली आहे.
सतर्कतेचा इशारा
ऑक्टोबर महिना हा पिकांच्या कापणीचा हंगाम असल्यामुळे, अशा वेळी पडणाऱ्या पावसामुळे भात, मका, सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतात पाणी साचल्यास पिके कुजण्याचीही भीती आहे.





