“लोकल ट्रेनमध्ये साजरा झाला श्रद्धेचा दसरा – कामगार प्रवाशांकडून महालक्ष्मी पूजन व महाप्रसाद वाटप”
सत्याचा शिलेदार वार्तापत्र | प्रतिनिधी: चंद्रकांत काळे, रायगड माथेरान

मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाची शान आणि आधारस्तंभ मानली जाणारी लोकल ट्रेन, फक्त प्रवासाचे साधन न राहता आता श्रद्धा आणि भक्तीचा मंचही बनत आहे. याचं जिवंत उदाहरण ठरलं दसऱ्याच्या दिवशी कर्जत–सीएसएमटी लोकलमध्ये साजरा झालेला भक्तिमय उत्सव.
दररोज सकाळी ७:५२ वाजता कर्जतहून मुंबईकडे धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या श्री रामकृष्ण हरी भजन मंडळाचे सदस्य आणि इतर कामगार प्रवाशांनी दसऱ्याच्या दिवशी महालक्ष्मी देवीची प्रतिमा बसवून पूजन, महाआरती आणि महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले. रेल्वेच्या डब्यातच भावपूर्ण वातावरण तयार झाले होते. संपूर्ण डबा भक्तिरसात न्हालेला दिसत होता.
या विशेष उपक्रमाचे आयोजन रवी शिंदे, योगेश सोनवणे व अशोक तावडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. शेकडो प्रवाशांनी एकत्र येऊन सहभाग घेतला आणि दसऱ्याच्या दिवशी एक आगळा वेगळा अनुभव घेतला.
हा उपक्रम केवळ धार्मिक श्रद्धा व्यक्त करणारा नव्हे, तर आपल्याला वर्षभर सेवा देणाऱ्या लोकल ट्रेनप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा देखील होता. यामधून ‘एकत्रितपणा’, ‘धार्मिक सलोखा’ आणि ‘सकारात्मकता’ यांचा संदेश देण्यात आला.





