शस्त्र पूजन व खंडेनवमी माहिती
सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी डॉ. उमेश सुतार
दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता. भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा केली. श्रीरामांनी पूर्ण नऊ दिवस रामेश्वरममध्ये देवीची पूजा केली होती. त्यामुळेच नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे.
पांडवांना 13 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात पाठवण्यात आले होते. हा वनवास सुरु करण्याआधी त्यांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या झाडावर लपवली होती. असे म्हटले जाते की अर्जुनाने ही शस्त्रे विजयादशमी (दसरा) च्या दिवशी परत आणली.. यानंतर त्यांनी युद्धाची तयारी सुरू केली आणि कुरुक्षेत्राचा विजय मिळवला. पांडव विजयादशमीला पुन्हा परत आले, म्हणूनच एक नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. पण कर्नाटकमध्ये विजयादशमीच्या एक दिवस आधी शस्त्र पूजा केली जाते.
प्राचीन काळी देखील शस्त्रांची पूजा केली जात असे कारण शस्त्रांच्या द्वारेच शत्रूला हरवणे शक्य होते. उदाहरणार्थ, कर्नाटकमध्ये देवी चामुंडेश्वरीने (पार्वती देवीच्या अवताराने) महिषासुर या राक्षसाचा वध केला. त्याच्या स्मरणार्थ आयुध पूजा करण्याची प्रथा आहे.
देवांविरुद्ध राक्षसांचे घनघोर युद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले. दहाव्या दिवशी पार्वती देवीचा विजय होऊन काशीमध्ये प्रवेश झाला. तोच आश्विन शुद्ध दशमीचा दिवस. याच दिवशी शमी वृक्षाची पूजा करून घरातील कर्त्या पुरुषाकडून आपट्याची पाने वाहून शस्त्रांचे विधिवत पूजन केले जाते.
वशिष्ठ धनुर्वेदात दगड, काठी, मुसळ, पाश, शिंगे याने लढणे प्रचलित होते. त्यास शिलाकाल म्हटले गेले. विश्वामित्रांच्या काळात तलवार, भाला, नारसिंहळ (कट्यार), सांग, गदा, माडू, धनुष्यबाण ही शस्त्रे प्रचलित झाली.
मुघल काळात वक्र पात्याच्या व साध्या मुठीच्या पर्शियन किरच किंवा किलीन तलवारी भारतात तयार होऊ लागल्या. त्यास ‘इंडो पर्शियन’ म्हणतात. डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, अबिसियन यांनी आणलेली पाती व भारतीय मुठी यापासून तलवारी बनू लागल्या. त्यास ‘अँग्लो इंडियन’ म्हणतात. भारतात वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या तलवारी तयार होत असत. त्या-त्या भागातील नैसर्गिक वैशिष्ट्यांचा, परंपरांचा व कलाकारांचा प्रभाव बनावटीत दिसून आला. ओडिशाचा खांडा, मराठ्यांची धोप, पंजाबी तेगा, कुर्ग तलवारी होत्या,ती या भागात प्रभावी शस्त्रे होती.
*खंडेनवमी*
हा दिवस आश्विन शुक्ल नवमीला साजरा केला जातो.हिंदू धर्म – परंपरेत या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. हा विजयादशमीच्या आधीचा दिवस असतो.
भारतातील लढवय्या जमातीचा हा विशेष सण भारतभरात साजरा केला जातो. राजस्थानात खड्गपूजेचा विशेष महोत्सव साजरा केला जाई.नवरात्रीच्या काळात या शस्त्रांची मिरवणूक काढली जात असे.
संस्थानिक घराण्यात या दिवशी नवरात्रीनिमित्त देवीला कोहळ्याचा बळी दिला जातो. पशुबली पद्धती बंद झाल्यानंतर कोहळ्याचा बळी देण्याची प्रथा सुरू झालेली दिसते.
खंडेनवमीच्या दिवशी गावातील शेतकरी हे शेतीची अवजारे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात. या दिवशी शिल्पकार आणि कारागीर आपआपल्या पारंपरिक कौशल्याच्या अवजारांची पूजा करतात.
महाराष्ट्रातील लोकदैवत श्री ज्योतिबा (कोल्हापूर) याचा पालखीसोहळा खंडेनवमीच्या दिवशी साजरा होतो.
नवरात्री आणि त्यानिमित्त होणारे उत्सव आदिवासीबहुल प्रांतात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरे होतात. नवरात्रीनिमित्त जय्रा भरतात. पोतराज हे या प्रांतांत विशेष आकर्षण असते. पशुबळी देतात आणि पशूच्या रक्ताने देवीला अभिषेक करतात. खंडेनवमीच्या दिवशी या जत्रेची सांगता होते.
आधुनिक काळात गावोगावच्या मोठ्या कारखान्यांमध्ये खंडेनवमीच्या दिवशी कारखाना स्वच्छ करतात. यंत्रांची आणि अवजारांची पूजा होते. रांगोळी काढून, झेंडूची फुले सजवून या दिवसाचा उत्साह वाढविला जातो.





